बेंगळुरू,दि.२०: महाराष्ट्रात नुकत्याच २९ महापालिका निवडणुका झाल्या आहेत. महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाला. भाजपने २० महापालिका निवडणुकीत बाजी मारली आहे. उर्वरित काही महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांची मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व निवडणुका या ईव्हीएम मशीनवर घेतल्या आहेत.
महाराष्ट्रात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत ही ईव्हीएम मशीन वापरली जाणार आहेत. अनेक वर्षापासून निवडणुका बॅलेट पेपरवर (Ballot Paper) घेण्यात याव्या अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. मात्र कर्नाटक निवडणूक आयोगाने कर्नाटकात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळुरू येथील २५ मे नंतर होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटर बंगळुरू एरिया स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी जी.एस संगरेशी यांनी ही घोषणा केली. येत्या मे-जून महिन्यात याठिकाणी निवडणूक लागणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस संगरेशी यांनी म्हटलं की, या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही बॅलेट पेपरने घेतल्या जातील. १० वी, १२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर २५ मे झाल्यावर स्थानिक निवडणुका घोषित केल्या जातील. यावेळी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाईल असं त्यांनी सांगितले.
भाजपाची प्रतिक्रिया
बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर भाजपाने ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा कडाडून विरोध केला. राजीव गांधी यांच्या काळापासून ईव्हीएमने निवडणूक घेण्याची प्रथा सुरू झाली. काँग्रेस पक्ष केवळ राहुल गांधींना खुश करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक घेत आहे. मात्र निवडणुकीत काँग्रेसचा पराभव स्पष्ट आहे मग ईव्हीएम असो वा बॅलेट पेपर असो टोला भाजपा प्रवक्ते प्रकाश एस यांनी लगावला.








