देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आमदाराची निवृत्तीची घोषणा

0

मुंबई,दि.१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आमदाराने निवृत्तीची घोषणा केली आहे. अलिकडच्या काळात राजकारणाचा स्तर घसरला आहे. सत्तेसाठी कायपण, कालपण, आजपण असे प्रकार घडत आहेत. भाजपा आमदार संदीप जोशी यांनी राजकारणाच्या खालावलेल्या स्तराचा उल्लेख केला आहे. त्यांच्या पत्रातील मजकुरावरून जोशी राजकारणातील संधीसाधूपणा, पक्षांतर याला कंटाळून राजकीय निवृत्ती घेत असल्याचे दिसून येत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार संदीप जोशींनी आपल्या राजकीय वाटचालीला पूर्वविराम देत असल्याचं जाहीर केलं आहे. १३ मे रोजी आमदारकीची मुदत संपल्यानंतर आपण पुन्हा कोणत्याही पदाची अपेक्षा करणार नसल्याचे सांगत, त्यांनी ‘तरुण रक्ताला जागा मिळायला हवी’ असे म्हटले आहे. 

आमदार संदीप जोशी

आता मला थांबायचंय

सत्तेसाठी सुरू असलेलं पक्षांतर, संधीसाधूपणा  आणि वाढलेली  स्पर्धा सामान्य मतदारांचा निष्ठावान कार्यकर्त्यांना  अस्वस्थ करणारी असल्याचं मत संदीप जोशींनी व्यक्त केलं आहे. त्यांनी फडणवीसांना ‘आता मला थांबायचंय!’ या मथळ्याखाली पत्र लिहिले आहे. 

पत्रातील मजकूर 

नमस्कार,
हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरु असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे.

मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व खासदार नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.

माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. १३ मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. १३ मे नंतर मी पूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन.

राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here