सोलापूर,दि.१७: महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल काल (दि.१६) लागले. राज्यातील २५ महापालिकेत भाजपा सत्तेत बसणार हे निश्चित झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे उमेदवार ८९ जागांवर विजयी झाले आहेत. तर शिवसेना (ठाकरे गट) ६५ जागांवर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ६ जागांवर विजयी झाले आहेत. मुंबई महापालिकेत मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोशल मिडीयावर (X वर) पोस्ट केली आहे.
अमित ठाकरे यांची पोस्ट
मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील ! 🚩
निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटनापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.
तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा !
जय महाराष्ट्र








