सोलापूर,दि.१५: सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून अनेक प्रभागातील मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. सायंकाळी ५ः३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मात्र सोलापुरातील प्रभाग क्रमांक २६ मधील गणेश बिल्डर्स स्किम नं ३, अमोल नगर तसेच लोखंडवाला पार्क येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. याचा फटका कोणत्या पक्षाला बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गणेश बिल्डर्स सोसायटीत ९० पेक्षा जास्त कुटुंबे राहत आहेत. मात्र येथील नागरिकांना रस्ता नसल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोखंडवाला पार्क येथील नागरिकांनाही रस्ता नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमोल नगर येथील नागरिकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. सचिन ओम्बासे यांना निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराने येथील नागरिकांशी संपर्क साधून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले नाही. किंवा मतदानावर बहिष्कार टाकू नये असे आवाहनही केले नाही, असे गणेश बिल्डर्स सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. नीता जोशी यांनी सांगितले.








