पुणे,दि.१४: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ( दि. १३) छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. या संस्थेबाबत आलेल्या एका तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंढवा खराडी रस्त्यावरील एका इमारतीत अरोरा यांच्या डिझाईन्ड बॉक्स या संस्थेचे कार्यालय आहे. तेथे मंगळवारी दुपारी पुणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या पथकाकडून संस्थेतील काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
नरेश अरोरांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. महापालिका निवडणूक अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली असतानाच अचानक अरोरा यांच्या कार्यालयावर टाकलेल्या या छाप्याबाबत अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना सांगितले, की, अरोरा यांच्यावर कारवाई केलेली नाही. गुन्हे शाखेला मिळालेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी अधिकारी गेले होते. तक्रारीत तथ्य नसल्याने अधिकारी परतले आहेत.








