सोलापूर,दि.९: महाराष्ट्र बिहारच्या दिशेने चालला आहे अशी टीका वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्रात निवडणुकांमध्ये तत्व सोडून, विचार सोडून अभद्र युती बघायला मिळत आहेत. पक्ष आणि विचार आता महत्त्वाचा राहिला नाही तर सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर महत्त्वाचे झाले आहे. मतदारांनी आता अनैतिकतेने वागणाऱ्यांना सत्तेपासून दूर केले पाहिजे, असे मत अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले.
गुरुवारी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेसाठी एड. आंबेडकर सोलापुरात आले होते यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी आपण सांगितले होते राज्यात अभद्र युती पाहायला मिळेल. अगदी त्याप्रमाणेच महाराष्ट्रात भाजप एमआयएम आणि भाजप काँग्रेस यांची युती झाली असल्याचे पाहिले. ही अभद्र युती आहे. अभद्र युती प्रकरणी काँग्रेसने कारवाई केली मात्र 24 तास उलटूनही भाजपाने कारवाई केली नसल्याचे दिसून येते.
आता राजकारणात पक्ष आणि विचार महत्त्वाचा राहिला नाही सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर महत्वाचे झाले आहे एका बाजूला देशावर संकट आहे दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर देश हाकण्याची धुरा आहे ते अनैतिक पद्धतीने वागतात. अशा अनैतिकतेने वागणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा, असे ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली ही समाजवादी विचारांची युती आहे. नांदेड, लातूर येथे काँग्रेस बरोबर वंचितने युती केली आहे. जिथे पाटीलशाही ने लोकशाही स्वीकारली तिथे आम्ही युती केली. इतर ठिकाणी शक्य झाली नाही, असे ते म्हणाले. काहीजण मनाने एकीकडे तर शरीराने दुसरीकडे अशी स्थिती राजकारणात पाहायला मिळत आहे. सन 2014 पासून आम्हाला दूर ठेवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था भाजप सांगेल तसे नाचण्यासारखी स्थिती झाली आहे. त्या सगळ्यांची रिपाइं झाली असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.
बिनविरोध निवडणुका संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, दबावाचे, धमक्याचे राजकारण चालले आहे. महाराष्ट्र बिहारच्या दिशेने चालला आहे. आता मारण्यापर्यंत ते विकत घेण्यापर्यंत प्रकार चालला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अर्धे उमेदवार भीतीपोटी अर्ज भरायला आले नाहीत. त्यांना दम दिला असल्याचा आरोपही यावेळी ॲड. आंबेडकर यांनी केला.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सोलापुरातील त्यांच्या एका निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रयत्न केले होते. तेव्हा चळवळीतील पक्षाचे उमेदवार मल्लपा शिंदे हे टिकून राहिले होते, अशी आठवणही ॲड. आंबेडकर यांनी करून दिली.
या पत्रकार परिषदेस प्रभारी सोमनाथ साळुंखे, प्रवक्ते अरुण जाधव, डॉ. नितीन ढेपे, चंद्रशेखर मडीखांबे, महेश जाधव, आतिश बनसोडे आदी उपस्थित होते.








