तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार: राज ठाकरे 

0
तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार: राज ठाकरे

सोलापूर,दि.८: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत पहिल्यांदाच घेण्यात आली आहे. उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी २० वर्षे लागली. यावर मुलाखतीत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला. 

दैनिक सामना मुलाखत 

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सामना’साठी संयुक्त मुलाखतदिली. महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत दोनठाकरे बंधू मराठी आणि मुंबई रक्षणासाठी एकत्र आले वत्यांनी गर्जना केली, ‘‘अभी नहीं तो कभी नहीं. ही मराठीमाणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. आम्ही दोन भाऊएकत्र आलोय. मराठी माणसानेही एक व्हायला हवे!’’

राज ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात राज्यकर्ते मराठी असतील, पण त्यांचे मालक दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करीत आहेत. आम्ही हे कारस्थान उधळून लावू.’’ उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, ‘‘आजचे राज्यकर्ते फक्त ठेकेदारांसाठीच काम करीत आहेत. मुळात राज्यकर्त्यांचे प्रेम हे राज्यावर असायला पाहिजे, सत्तेवर असता कामा नये. इथे राज्य संपले तरी चालेल, पण ठेकेदारांसाठी सत्ता राबवली जातेय.’’ उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुलाखतीत अक्षरशः घणाघात केला. ‘‘महाराष्ट्र राज्य म्हणजे ‘क्लीन चिट’ देण्याची फॅक्टरी झाली आहे.’’

सुरुवातीलाच ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा विषय आला. संजय राऊत यांनी विचारले, ‘‘महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला. 20 वर्षांनंतर आपण दोघे एकत्र येऊन मुंबई, मराठी माणूस व महाराष्ट्रावर चर्चा करत आहात, पण महाराष्ट्राच्या मनात एक ‘कॉमन प्रश्न’ आहे. दोघांनी त्यावर बोलायला हवे. हा दिवस उजाडण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पहावी लागली?’’

राज ठाकरे – मला असं वाटतं की, काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं? हे आज आता सोडून दिलं पाहिजे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयावर अनेक वर्षे मी बोलतोय, उद्धवही बोलतोय. आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे, ज्याला आपण ‘अभी नही तो कभी नही’ म्हणतो तशा वळणावर. तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. खरं तर एमएमआर रिजनवर येऊन ठेपलेली आहे. एमएमआर रिजन मी मुद्दाम बोलतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार!

उद्धव ठाकरे – खरं तर, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील.

संजय राऊत – महाराष्ट्र वाचवण्यासाठी किंवा मुंबईसहमहाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनीशिवसेनेची स्थापना केली. इतक्या वर्षांनंतरसुद्धा संयुक्तमहाराष्ट्राच्या लढय़ाची उदाहरणं आपण देतो. विशेषतःठाकरे कुटुंब देतं. तुम्ही दोघेही देता. आता तुम्हालासंयुक्त महाराष्ट्राच्या वेळेसारखी परिस्थिती जाणवतेका? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणूसजसा एकवटला होता, तेच वातावरण आता दिसतंय का?

राज ठाकरे – अर्थातच दिसतंय. तुम्ही बघाल तर त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्यानंतर सहाएक वर्षांनी माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. तेव्हा पुन्हा मराठी माणूस एकवटला होता. त्याला तशी गरज वाटली. आज तेच चित्र दिसतंय.

तेव्हाचे प्रश्न वेगळे होते. आज काय चित्र आहे?

स्थिती गंभीर झालीय. जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येतायत, तेवढे आधी येत नव्हते. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर उत्तरेतून जवळपास रोज 56 ट्रेन्स महाराष्ट्रात येतात. भरून येतायत आणि रिकाम्या जातायत. ठाणे जिल्हा पाहा. हा जगातला एकमेव असा जिल्हा आहे, जिथे 8 ते 9 महानगरपालिका आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,

यांचा डोलारा फक्त मोदींवर अवलंबून आहे!

भिवंडी, त्यात पालघर जिल्हा वेगळा पकडू नका. वसई-विरार, मीरा-भाईंदर… म्हणजे जवळपास 8-9 महापालिका आहेत. याची सुरुवात होते ग्रामपंचायत, पंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका… लोकसंख्येनुसार हे स्वरूप बदलत जाते. आज मुंबईत एक महानगरपालिका आहे, पुण्यात दोन आहेत. ठाणे जिह्यात 8-9 महानगरपालिका.

याचं कारण काय?

याचं कारण बाहेरून येणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण. तेच प्रमाण मुंबईत वाढतंय. नुसतं लोकसंख्येचं प्रमाण वाढतंय असं नाही. त्यांची दादागिरी पहा. ‘मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर हिंदू करणार.’ अशी वाक्ये कशी येऊ शकतात? हे कधीपासून सुरू झालं? ही माणसं फक्त रोजीरोटीसाठी येत नाहीएत, हे आपापले मतदारसंघ बनवतायत. तेच चित्र आता दिसतंय. जुनी जखम जी आहे ना, मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं. हे जे स्वप्न आहे, ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठी या लोकांचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळं मला असं वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जसं मुंबई वेगळी करणं, गुजरातनं मागणं असं जे वातावरण होतं, तेच आज आहे. मुंबई वेगळी करणं ही ज्यांची इच्छा आहे तेच केंद्रात आहेत, राज्यातही तेच आहेत आणि महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेत आले तर मला असं वाटतं की, मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे हतबलतेने पाहणं हे आमच्याकडून होणार नाही, म्हणून आम्ही एकत्र आलो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here