Home क्राइम एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न

एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न

0

छत्रपती संभाजीनगर,दि.७: एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रचार रॅलीवर हल्ला करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी जलील हे प्रचारात सहभागी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यावेळी वाहनात इम्तियाज जलील पुढच्या सीटवर बसले होते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीवर बायजीपूरा भागात एका गटाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत एक कार्यकर्ता जखमी झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

प्रचार रॅली बायजीपूरा परिसरातून जात असताना सुरुवातीला काही तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी माजी खासदार जलील यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रॅली पुढे गेली, पण रॅली संपताच अचानक काही तरुण जलील यांच्या गाडीच्या दिशेने चाल करून आले. यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. जलील यांनी हा हल्ला कॉँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी केल्याचा आरोप केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.