सोलापूर,दि.३१: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म दाखल करण्याची वेळ काल (दि.३०) दुपारी ३ पर्यंत होती. मात्र भाजपाने दुपारी ३ नंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट तसेच शिवसेना शिंदे गटासह काँग्रेसने केला होता. मनसेसह अनेक पक्षांनी यावर आक्षेप घेतला होता. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. सचिन ओम्बासे यांनी दुपारी ३ वाजल्यानंतर एबी फॉर्म स्वीकारता येणार नाहीत असे म्हटले आहे. तसेच डॅा. ओम्बासे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रसाद निवृत्ती माने यांनी महेश अंकुश अलकुंटे यांनी दुपारी ३ नंतर एबी फॉर्म दाखल केला आहे असा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी (रोहयो) सोलापूर तथा निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 4 अंजली मरोड यांनी तक्रारी अर्जावर चौकशी करून निकाली काढत असल्याचे तक्रारदार प्रसाद माने यांना कळविले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 4 अंजली मरोड यांचे स्पष्टीकरण
आपण केलेल्या तक्रारी अर्जानुसार मी स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 4 कक्षातील C.C.T.V. तपासले असता त्यामध्ये असे आढळून आहे की, श्री महेश अंकुश अलकुंटे यांनी दुपारी 3.18 मिनीटांनी खिडकीतून काही कागदपत्रे घेतल्याचे निर्देशनास आले आहे, याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यानुसार ते जेव्हा निर्धारीत वेळेत निवडणुक निर्णय अधिकारी क्र. 4 यांचे कक्षात दाखल झाले तेव्हा त्यांचे सोबत पक्षाने दिलेले B Form होते.
निवडणुक निर्णय अधिकारी क्र. 4 यांचे कक्षाचे मुख्यव्दार 3.00 वाजता बंद करण्यात आले होते. श्री अलकुंटे यांच्या मित्राजवळ त्यांची फाईल होती ती त्यांच्या मित्राने तो घरी जाणार असल्याने त्यांचेकडे असलेली File मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे ती फाईल खिडकीत त्यांचेकडे दिली, असे नमूद केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 4 कक्षातील C.C.T.V. फूटेज तपासले तपासले असता नक्की काय दिले याची शहानिशा करता येत नाही. व ते B Form होते याचा कोणताही ठोस पुरावा आढळून येत नाही.
उमेदवार श्री महेश अंकुश अलकुंटे हे निर्धारीत वेळेच्या आत माझ्या कक्षात उपस्थित होते व त्यांचे जवळ B Form होते. त्यामुळे मला सदरचे B Form स्वीकारणे आवश्यक असलेने B Form स्वीकृत केले आहेत. त्यामुळे आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे, असे सोलापूर महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 4 अंजली मरोड यांनी म्हटले आहे.









