सोलापूर,दि.३१: सोलापूर महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल (दि.३०) मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. काल भाजपाच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यावरून शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन केले. काल दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. अनेकांची उमेदवारी रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पार्टीने उमेदवारीची मागणी करणाऱ्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट केला आहे तर बिज्जू प्रधाने आणि मंदाकिनी तोडकरी यांना प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारी दिली आहे. प्रधाने आणि तोडकरी यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला होता. दुसरीकडे सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. माजी उपमहापौर राजेश काळे, तसेच माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांनाही उमेदवारी देण्यात आली नाही.
विधानसभा निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवार होते. मात्र या निवडणुकीदरम्यान काही माजी नगरसेवकांनी उघडपणे अथवा अप्रत्यक्षपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप आहे. माजी नगरसेवक श्रीनिवास करली, वरलक्ष्मी पुरुड, माजी महापौर राजेश काळे, वैभव हत्तुरे, राजश्री चव्हाण आदींनी विरोधकांच्या बाजूने काम केल्याचे बोलले जात होते. याशिवाय काही माजी नगरसेवकांनी थेट बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचीही चर्चा होती.
सुरेश पाटील यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तर उपमहापौर राजेश काळे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याविरोधात भूमिका घेतली होती असा आरोप केला जात होता. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यामुळे सुरेश पाटील, राजेश काळे तसेच वैभव हत्तुरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

माजी सभागृह नेते सुरेश पाटील तसेच राजेश काळे यांच्या पत्नी उषा काळे यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. वैभव हत्तुरे आणि राजश्री चव्हाण यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. कालच राजेश काळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत दिले होते.

राजेश काळे यांची पोस्ट
मी कधीही व्यक्तिनिष्ठ होऊ शकलो नाही
मी राष्ट्रनिष्ठ आहे, पक्षनिष्ठ आहे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
मी माझ्या माणसांचा प्रभागनिष्ठ आहे.
आज माझे पंख… जुळे सोलापूरला स्वप्नवत घडवण्याचे उद्दिष्ट कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पद कोणालाही मिळो,
माझा लढा मात्र जुळे सोलापूरकरांच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत सुरूच राहील.
विविध पक्षांच्या उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म दाखल करावे लागत असतात. भाजपाने दुपारी तीन नंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे खासदार प्रणिती शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच सोलापूर महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. सचिन ओम्बासे यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.








