सोलापूर,दि.३१: सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. सचिन ओम्बासे (Dr. Sachin Ombase) यांनी दुपारी ३ वाजल्यानंतर एबी फॉर्म स्वीकारता येणार नाहीत असे म्हटले आहे. महानगरपालिका कार्यालयात काल (दि.३०) दुपारी ३ पर्यंत उमेदवारी दाखल करण्यासाठी वेळ होता. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना भाजपाने ऐनवेळी एबी फॉर्म दिले. दुपारी तीन नंतर भाजपाने उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच मनसेने केला होता.
भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आमदार सचिन कल्याणशेट्टी हे एबी फॉर्म घेऊन काल तीनच्या सुमारास निवडणूक कार्यालयात पोहोचले होते. यावर अनेक पक्षांनी आक्षेप घेतला होता. ३ नंतर एबी फॉर्म घेता येणार नसल्याचे सांगत खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचे महापालिका आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. सचिन ओम्बासे यांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या निवडणूक कार्यालय क्र. २ मध्ये झालेल्या गोंधळाचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांच्याकडून मागवला आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर एबी फॉर्म स्वीकारता येणार नाहीत, असे मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
डॉ. ओंबासे म्हणाले, कायद्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या वेळेला निवडणूक कार्यालयात हजर असलेल्या उमेदवारांकडून अर्ज भरुन घेण्याची तरतूद केली आहे. आता निवडणूक कार्यालयात किती लोक होते. बाहेर किती होते याची माहिती नाही. एबी फॉर्म भरण्याची मुदत दुपारी तीनपर्यतची आहे.
वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म दाखल करण्यास आल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. त्यानुसार अहवाल मागवला आहे. सर्व निवडणूक कार्यालयात दाखल झालेल्या अर्जाची छाननी आजच होणार आहे. छाननीची प्रक्रिया मंगळवारी रात्री पूर्ण होणार आहे. घडलेल्या घटनांचे छायाचित्रीकरण झाले आहे. त्याची तपासणी होणार आहे. माझ्याकडे एकाही उमेदवाराचा एबी फॉर्म आलेला नाही.








