सोलापूर,दि.३०: सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी निवडणूक आयोगाकडे सोलापूर महापालिका निवडणूक संदर्भात मोठी मागणी केली आहे. सोलापूरमध्ये शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसने भारतीय जनता पार्टीवर वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. दुपारी 3 पर्यंतच वेळ होती.
मात्र दुपारी 3 नंतर भाजपाने एबी फॉर्म दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रसने महापालिका निवडणूक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. भाजपा सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. वेळ संपल्यानंतर देण्यात आलेले एबी फॉर्म ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे. प्रणिती शिंदे यांची मागणी मान्य झाल्यास अनेकांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे.
प्रणिती शिंदे यांनी केलेली मागणी
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ संदर्भात आज दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या नियम व वेळापत्रकानुसार सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या अधिकृत उमेदवारांचे A व B फॉर्म (पपत्र ०१ व पपत्र ०२) दुपारी ३:०० वाजेपर्यंत संबंधित निवडणूक कार्यालयात दाखल करणे बंधनकारक आहे.
मात्र आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीकडून दुपारी ३:०५ वाजेपर्यंत एकही A किंवा 8 फॉर्म (पपत्र ०१ व पपत्र ०२) संबंधित निवडणूक कार्यालयात सादर करण्यात आलेला नाही, ही बाब प्रत्यक्ष उपस्थितीत स्पष्टपणे निदर्शनास आली आहे. सबब, राज्य निवडणूक आयोगाच्या विद्यमान नियमांनुसार मुदतीनंतर दाखल करण्यात येणारे A व B फॉर्म (पपत्र ०१ व पपत्र ०२) ग्राह्य धरता येत नाहीत. परिणामी, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरतात, असे स्पष्ट होते. तरी वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबाबत निवडणूक नियमांनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे.









