सोलापूर,दि.३०: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. अशातच सकल ओबीसी समाजाने राजकीय पक्षांना इशारा दिला आहे. महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांकडून मूळ ओबीसी घटकांवर अन्याय होत असल्याचा आरोप सकल मूळ ओबीसी समाज व धनगर समाज समन्वय समितीने केला आहे.
सुमारे दीड लाख मतदार असलेल्या धनगर समाजासह तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, नाभिक, सुतार, लोहार, शिंपी, परीट आदी सर्व मूळ ओबीसी घटकांना त्यांच्या हक्काच्या जागांवर उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. समितीने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर पालिकेच्या सत्तेत धनगर समाजाची भूमिका निर्णायक असूनही या समाजाकडे केवळ ‘वोट बँक’ म्हणून पाहिले जाते.
पिढ्यानपिढ्या ओबीसी असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बोगस प्रमाणपत्रधारक उमेदवारांना संधी दिल्यास, समाज आपली ताकद मतदानातून दाखवून देईल, असा इशाराही देण्यात आला. मूळ ओबीसींच्या राखीव जागांवर प्रस्थापित व सधन वर्गातील काही व्यक्ती बोगस कागदपत्रांच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार आरक्षणाची चोरी असून खऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा असल्याचे समितीने स्पष्ट केले. ओबीसी प्रवर्गातील सर्व अठरापगड जातींना लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी उमेदवाराची मूळ जात व वंशावळ तपासावी, अन्यथा ‘एक समाज, एक मतदान’ची भूमिका घेऊन अपक्ष उमेदवार उभे केले जातील, असा निर्वाणीचा इशारा सकल मूळ ओबीसी समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.








