दोन्ही आमदार देशमुख आक्रमक; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मोठे विधान 

0

सोलापूर,दि.२८: सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोठे विधान केले आहे. आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) आणि आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) हे भाजपात इतर पक्षातील नेत्यांचा होणाऱ्या पक्षप्रवेशावरून नाराज आहेत. दोन्ही देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. गोरे यांच्यावर दोन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. महापालिका निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी शक्यता आमदारांनी व्यक्त केली होती. 

काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे?

महानगरपालिका निवडणुकीत आपण फक्त समन्वयक म्हणून भूमिका बजावत आहोत. सर्व उमेदवार हे शहरातील तिन्ही आमदार आणि शहराध्यक्ष ठरवणार आहेत. युतीचा  निर्णय देखील त्यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल. पक्षाचा मूळ कार्यकर्ता जो वर्षानुवर्ष पक्षाबरोबर आहे अशा निष्ठावंतांना बहुतांश ठिकाणी उमेदवारी दिली जाईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.हे सांगताना काही ठिकाणी राजकारणाची गणिते बसवावी लागतात हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

शनिवारी (दि.२७) पालकमंत्री गोरे यांनी हॉटेल बालाजी सरोवर येथे आमदार.विजयकुमार देशमुख यांच्याशी बंद खोलीत  सुमारे दीड तास चर्चा केली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी पक्षाची भूमिका, तिकीट वाटप आणि युतीचे अधिकार याचा उहापोह केला. महानगरपालिका निवडणुकीसाठी मी फक्त समन्वयक आहे. जागा वाटपाचा निर्णय स्थानिक आमदार घेणार आहेत हे आपण यापूर्वीही सांगितले होते आणि आजही तेच सांगत आहे.

युतीचा प्रस्ताव प्रभारी म्हणून आपल्याकडे आला असला तरी आपण स्थानिक आमदारांशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय घेणार आहोत. महायुतीतील घटक असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युतीचा प्रस्ताव दिला नसल्याने त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रस्ताव  आला असून यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत, असेही ते म्हणाले.

तिकीट वाटपाचा तिढा सुटला आहे

तिकीट वाटपाचा नव्वद टक्के तिढा सुटला आहे. बहुतांश ठिकाणी भाजपच्या निष्ठावंत मूळ कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे.काही ठिकाणी राजकारणाची गणिते बसवावी लागतात. त्याचाही विचार करावा लागणार. महानगरपालिका निवडणुकी संदर्भातआमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. आहे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील तिन्ही आमदारांचे एकमेकांच्या मतदारसंघात कार्यकर्ते आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र त्यातूनही  समन्वयातून मार्ग काढण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.

शहरात भाजप मजबूत स्थितीत आहे. पक्षाचे तीन आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे त्यामुळे इच्छुकही जास्त आहेत.शिवसेनेने मागितलेल्या जागांची पूर्तता करणे शक्य नाही. रिपाई आठवले गटाचा युतीसाठी प्रस्ताव आला आहे.त्यामुळे शिवसेना व  रिपाईशी युती बाबत स्थानिक नेतृत्वांशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

गैरसमज दूर 

आपण चाळीश वर्ष झाले पक्षाशी एकनिष्ठ आहोत पक्षासोबत व माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आपली भूमिका होती. गैरसमजातून काही बोललो असेल. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे त्यामुळे गैरसमज दूर झाल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here