फक्त व्हाट्सअॅप चॅट पुरेसे नाही म्हणून युवकास जामीन मंजूर 

0

सोलापूर,दि.२७: “फक्त व्हाट्सअॅप चाट पुरेसे नाही” म्हणून युवकास अमली पदार्थ विक्रीप्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी अतिश बाबू राठोड रा. दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर या आरोपीस गांजा विक्री  केल्याप्रकरणी सोलापुर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जामीन मंजूर केला.

यात हकिकत अशी की, फिर्यादी हे जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असताना त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर येथे एका घरामध्ये एक इसम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन आला आहे. 

त्यानुसार फिर्यादी हे २ पंचाना बोलावून त्यांच्या पूर्ण टीमसह घटनास्थळावर आले. त्या ठिकाणी एक इसम एका घरात थांबलेला होता. फिर्यादी यांना पाहून तो इसम घराबाहेर आला त्यास नाव विचारले असता त्याने दादासाहेब भोसले असे असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या इतर साथीदारांनी त्याची घर झडती घेतली असता तेथे दरवाजाचे पाठीमागील कोपऱ्यात कपडे बांधलेले पोते होते व त्याच्या खालील बाजूस एक गुलाबी रंगाची कापडी पिशवी मिळून आली. 

सदरची कापडी पिशवी उघडून पहिले असता त्यामध्ये पोपटी रंगाची प्लास्टिक पिशवी होती व त्यामध्ये आणखीन तीन प्लास्टिक पिशव्या होत्या. त्यामध्ये मिळून आलेला पदार्थाचा फिर्यादी यांना अमली पदार्थ असल्याचा संशय आल्यामुळे सदर इसम दादासाहेब भोसले यास अटक करण्यात आली व पुढील तपासामध्ये व्हाट्सअॅप वरील चॅटवरून सदर आरोपी अतिश बाबू राठोड याचे नाव निष्पन्न झाले. 

सदर आरोपी अतिश बाबू राठोड याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधित कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. अशा आशयाची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती. सदर कामी आरोपी अतिश बाबू राठोड यांनी अॅड. अभिजीत इटकर यांच्या मार्फत नियमित जामीन मिळणे कामी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे अर्ज दाखल केलेला होता.

यात आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सदर आरोपीस अटक करताना काही अमली पदार्थ प्रतिबंधित कायद्यामधील तरतुदींचे पालन करणे अत्यंत गरजेचे व महत्वाचे असते पण त्याची पूर्तता दिसून येत नाही तसेच सदर आरोपीकडून कसल्याही प्रकारचा अमली पदार्थ जप्त केलेला नाही. तसेच व्हाट्सअॅपवरील चॅटवरून सदर आरोपी हा अमली पदार्थाची विक्री करत होता असे निष्पन्न होत नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा. 

सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी अतिश बाबू राठोड रा. दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर याचा जामीन अर्ज मंजूर केला.

यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे , अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख, अॅडसुमित लवटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here