भा. न्या. सं. प्रमाणे दाखल झालेल्या खून खटल्यातील आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

0

सोलापूर,दि.२०: भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल झालेल्या पहिल्या खून खटल्यातील आरोपीस उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पार्टीसाठी तगादा लावला म्हणून मित्र विनायक हक्के याचा डोक्यात दगड घालुन खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी नागेश अण्णाराव चिक्कळे रा. जुळे सोलापूर याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमुर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर होवुन न्यायमुर्तींनी आरोपीचे जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाची हकीकत अशी की, यातील मयत विनायक हक्के व आरोपी नागेश चिक्काळे हे दोघे मित्र होते. दि. ०१/७/२०२४ रोजी यातील विनायक हक्के याने आरोपीस दारु पिण्यासाठी पैसे दे म्हणून तगादा लावला होता. या कारणावरुन मयत विनायक व आरोपी नागेश यांच्यात वाद विवाद होऊन धक्काबुक्की झाली व त्यातुन झालेल्या भांडणात रागाच्या भरात आरोपी नागेश चिक्काळे याने विनायक हाके याचा डी मार्ट समोरील पटांगणात रात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालुन खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.

आरोपी नागेश चिक्काळे याचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने  ॲड. जयदीप माने (Jaydeep Mane) यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात येथे जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचचे न्यायमुर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर झाली. 

सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी व मयत हे दोघे जिवलग मित्र होते, त्यामुळे आरोपीने खून करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही व सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला पुरावा विश्वासहऱ्या नाही असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकुन न्यायमुर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे  ॲड. जयदीप माने ,ॲड. मनोज गिरी यांनी तर सरकारतर्फे ॲड. प्रियांका राणे यांनी काम पाहिले. नवीन फौजदारी कायदा 

भारतीय न्याय संहिता ०१.०७.२०२४ पासून आमलात आला व या नवीन कायद्या अन्वये दाखल झालेला हा महाराष्ट्रातील दाखल झालेला पाहिलाच खुनाचा गुन्हा होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here