सोलापूर,दि.१९: माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माने यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपला बळ मिळणार आहे. माने यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत होता. आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांच्यासह समर्थकांचा विरोध होता.
माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख समर्थकांनी कडाडून विरोध केला होता. एवढ्यावरच न थांबता धरणे आंदोलन करून प्रदेशाध्यक्षांना भेटून विरोध दर्शविला होता मात्र या विरोधाला न जुमानता गुरुवारी (दि.१८) दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत माने यांच्यासह त्यांचे बंधू जयकुमार माने, पृथ्वीराज माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, दादाराव ताकमोगे, प्रथमेश पाटील, धनंजय भोसले, यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षात निष्ठेने काम करेन: दिलीप माने
भाजपची ध्येय धोरणे, विकासात्मक विचारधारा या बाबीमुळे आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगून पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू. पक्षात निष्ठेने राहू अशी प्रतिक्रिया माजी आमदार दिलीप माने यांनी पक्षप्रवेश सोहळ्यानंतर दिली.
आमच्यात भागीदारी करू नये: आमदार सुभाष देशमुख
दिलीप माने यांना प्रवेश देऊ नये,ही कार्यकर्त्यांची भावना आपण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही आपल्याला न विचारता माने यांना पक्षात प्रवेश देण्यात आला,पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली असून पुढील काळात मतदार आणि कार्यकर्ते जी भूमिका घेतील, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.आतापर्यंत पक्षाने दिलेले सर्व आदेश आपण शिस्तीने पाळले आहेत.वरिष्ठांनी पक्षवाढीसाठी माने यांना घेतले असेल तर त्यामागची कारणे आपल्याला माहिती नाहीत. मात्र माने यांच्या गटाला कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर आता नाईलाजाने का होईना विश्वास ठेवावा लागणार असल्याचे नमूद करून त्यांनी आमच्यात भागीदारी करू नये असे आमदार देशमुख म्हणाले.








