मुंबई,दि.6: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. राज्यात भाजपा सरकार सत्तेत येऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारच्या वर्षपूर्तीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. महाराष्ट्राच्या जनतेचे मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला. मागील एक वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे फडणवीस म्हणाले.
एका वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर आणल्याचा दावा फडणवीस यांनी केला. लाडली बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज यांसारख्या लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सौर कृषी पंपांच्या स्थापनेत महाराष्ट्राने जागतिक विक्रम नोंदवला आहे. एका महिन्यात 45,911 पंप स्थापित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले. देशभरातील एकूण नऊ लाख पंपांपैकी सात लाख पंप एकट्या महाराष्ट्रात लावण्यात आले आहेत.

2029 ला कोण होणार पंतप्रधान?
मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल, अशा आशयाचे विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण यांना अनेकदा अशी स्वप्ने पडतात. पण मी तुम्हाला सांगतो की, हे लक्षात ठेवा की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. या देशात त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. ज्या पद्धतीने ते देशाला पुढे नेत आहेत, ते कुणीच करू शकत नाही, हे आपण सगळे जण जाणतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांची तब्येत उत्तम आहे. 40 वर्षाच्या व्यक्तिला लाजवेल, अशी कार्यक्षमता आहे. त्यामुळे 2029 लाही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, हे लक्षात ठेवले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.








