सोलापूर,दि.30: मागील आठवड्यात सोलापूर शहरातील दोन सराफ व्यापारी, रियल इस्टेट मधील चार व्यावसायिक व प्रसिद्ध वकिलाच्या फर्म आणि घरांवर आयकर विभागाकडून धाड टाकून केलेल्या कारवाईचा पुणे येथील आयकर विभागाचे महासंचालक (अन्वेषण) संदीप प्रधान, प्रधान महासंचालक मोहित जैन (अन्वेषण) हे शुक्रवारी सोलापुरात येऊन आढावा घेतला. त्यांच्या समवेत अतिरिक्त संचालक (अन्वेषण) सौरभ नायक हे देखील होते.
या कारवाईत सुमारे 200 कोटी रुपयेहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सील करण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. आयकर विभागाचे उपसंचालक (अन्वेषण) मनीष रावत यांच्याकडे सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे. सोलापुरात दोन वर्षांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळा पैशाचा वापर झाल्याची कुणकुण आयकर अधिकारी रावत यांना लागली होती. तेव्हापासून शहरातील चार बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडावर आले.
याशिवाय काही सराफ व्यावसायिक बेकायदेशीर मनी लँडरिंगची व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयकर विभागाचे महासंचालक प्रधान व जैन यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी शहरातील सात जणांच्या घरावर आणि फर्मवर नियोजनबद्ध धाड टाकण्यात आली. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरसह 90 आयकर निरीक्षकांचा समावेश होता.
या कारवाईत आयकर अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले याबाबत शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता होती. हिशेबाच्या गोपनीय डायरी, काही कागदपत्रे , सोने चांदीचे दागिने , रोकड अधिकाऱ्यांच्या हाती लागले. डायरीमधील आर्थिक व्यवहाराबाबत संबंधितांकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नसल्याने त्या डायरीसह अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आले होते.
धाडी टाकण्यात आलेल्या काही जणांचे एकमेकांसोबत आर्थिक व्यवहार झाल्याचेही स्पष्ट झाले. शुक्रवारी आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोलापूरच्या कार्यालयात येऊन मागील आठवड्यात टाकण्यात आलेल्या धाडीतील मुद्देमाल, कागदपत्रे, पंचनामा आदींची माहिती घेतली.या कारवाईत कोणी किती कर चुकवेगिरी केली आहे याबाबत आयकर अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या कारवाईमुळे कर चुकवेगिरी करून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.








