सोलापूर,दि.29: सोलापूरकरांचे अनेक वर्षांचे आयटी पार्कचे (Solapur IT Park) स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर असून, होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्कासाठी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तयार केलेला सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळताच आयटी पार्कचे काम सुरू होऊन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. समितीची बैठक येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असल्याने या प्रकल्पाला आता वेग येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याची मागणी होत होती. तीन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला योग्य जागेचा शोध घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने हिरज, कुंभारी, जुनी मिल आणि होटगी या ठिकाणांची पाहणी करून अंतिमतः होटगी येथील जागा निवडली.
होटगी येथील जलसंपदा विभागाच्या मालकीची 50 एकर जागा प्रथम लॉजिस्टिक पार्कसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता तीच जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेसाठी एमआयडीसीकडून साडेतीन कोटी रुपये जलसंपदा विभागाला अदा केले जाणार आहेत. तर आंतरिक रस्ते, प्रकाशयोजना, पाणी यांसह आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सुमारे 37 ते 38 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित आयटी पार्क विमानतळाच्या ‘फ्लाइट फनेल’मध्ये नसल्यामुळे बांधकामाला अडथळा नसून, 50 मीटर उंचीपर्यंत बांधकाम करण्यास परवानगी आहे. यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाचा सकारात्मक अभिप्रायही मिळाला आहे. 50 एकर क्षेत्रावर सुमारे 40 ते 45 हजार आयटी कर्मचारी काम करू शकतील, अशी क्षमता या पार्कमध्ये असेल. विशेष म्हणजे, पुणे येथील हिंजवडी आयटी पार्कच्या तुलनेत येथे जागा अर्ध्या किंमतीत उपलब्ध होणार असल्याने आयटी कंपन्यांसाठी सोलापूर अधिक आकर्षक ठरणार आहे. या सर्व प्रक्रियेमुळे सोलापूरकरांचे आयटी पार्कचे स्वप्न आता लवकरच साकार होण्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे चित्र आहे.








