सोलापूर विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय 

0

सोलापूर,दि.२८: सोलापूर विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्त डॅा. सचिन ओम्बासे (Dr. Sachin Ombase) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर-गोवा, सोलापूर-मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. होटगी रस्त्यावरील विमानतळ परिसरात मटण, चिकन, मांस तसेच इतर कचरा टाकणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून विमानसेवा सुरळीत व विना अडथळा सुरु ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे. 

होटगी रोड विमानतळावरुन नियमित विमानसेवा सुरु आहे. विमानतळ परिसरातील विविध समस्येबाबत विमान प्राधिकरण, जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस प्रशासन अशा विविध शासकीय यंत्रणाची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये  जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणाना आवश्यक सूचना दिल्या आहेत.या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुचनापत्र जारी केले आहे.

विमानतळ परिसरातील नई जिंदगी भागात मोठ्या प्रमाणावर चिकन,मटन व मांस विक्रेते असून त्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यांची विक्री उघड्यावर न करता बंदिस्तपणे करण्याचे आदेश दिले आहेत. मांसाचे तुकडे किंवा त्याचा कचरा पडल्याने मोकाट जनावरे तसेच पक्षी त्याठिकाणी गोळा होतात. 

हवेत उडणारे पक्षी विमानसेवेला अडथळा आणतात. त्यामुळे प्रवाश्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हा संभाव्य धोका लक्षात घेऊनच याठिकाणचा कचरा बंद डब्यात ठेवण्याबाबत  सूचना दिली आहे. त्या भागात कचरा उचलण्यासाठी सकाळी व दुपारी दोन्ही सत्रात दोन स्वतंत्र घंटागाड्यांची व्यवस्था करण्यातत आली आहे असेही आयुक्तांनी सांगितले. 

महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक तसेच तीन आरोग्य निरीक्षक यांना आठवड्यातून एक-दोन वेळेस विमानतळ परिसराला भेट देऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील नागरिकांनी अथवा विक्रेत्यांनी कचरा घंटागाडीत न टाकता सार्वजनिक ठिकाणी टाकल्याच्या तक्रारी आल्यास तात्काळ संबंधिताविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले. 

शहरात सुमारे ३६२ मटन, चिकन मांस विक्रेते आहेत. विनापरवाना अथवा परवान्याचे नूतनीकरण न करणा-या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. तसेच याकरिता महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय पुढील प्रक्रिया करू नये असेही कळविणेत येणार आहे असेही आयुक्तांनी सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here