मुंबई,दि.23: महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात पूर आला होता. सोलापूर शहरात 10 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसाने सोलापूर शहरात हाहाकार माजवला होता. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल झाले होते. सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हिवाळ्यात थंडी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमानाचा पारा घसरला असून थंडीचा लाट आली आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भ गारठला आहे. मात्र असे असतानाच ऐन थंडीच्या हंगामात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण अंदमान समुद्रात शनिवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. वायव्येकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळं दक्षिण भारतासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आकाश ढगाळ होत असून राज्यातील थंडीची लाट ओसरू लागणार आहे.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, कोकणात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळं पुढील 3 दिवस थंडी काहीशी कमी राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानात किंचितशी वाढ झाल्यामुळे हाडे गोठवणाऱ्या थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.








