बारामती,दि.१९: नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने केलेली पूजा चर्चेत आली आहे. हा खळबळजनक प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar House Black Magic) यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीजवळ घडल्याचे समोर आले आहे.
या पूजेमध्ये नारळ, लिंबू, वेगवेगळ्या डाळी, काळ्या रंगाची काढलेली चांदणी, हळद कुंकू आणि गारगोटीचे दगड वापरण्यात आले होते. निवडणूक काळात अज्ञात व्यक्तीने केलेल्या या पूजेचा नेमका हेतू काय होता, हे अद्याप समोर आलेला नाही.
या घटनेबाबत बारामती येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. पाटील, छत्रपती कारखान्याचे संचालक अजित पाटील, आणि अभिनेते रामभाऊ जगताप यांच्यासह सोमवारी सकाळी ‘मॉर्निग वॉक’साठी सह्याोग सोसायटीपासून निघाले होते. याच वेळी रस्त्यावर काही अंतरावर कुणीतरी पूजा करून भानामतीचा उतारा ठेवलेला होता.
या प्रकारामुळे रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक घाबरून जरा दूरून चालत होते. तसेच, स्वच्छ्ता करणारी महिला देखील मनातील अंधश्रद्धेमुळे ते साफ करायला धजावत नव्हती.
शेवटी, विपुल पाटील यांनी उतारा ठेवलेल्या ठिकाणी थांबून ती जागा साफ करायला लावली. ज्याने कोणी मनात काही मनसुबे ठेवून ही पूजा केली होती, ती सामग्री पोत्यात भरून कचरा डेपोकडे रवाना करायला स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले.
निवडणुका जवळ आल्या की अशा गोष्टी घडत असतात. कदाचित ही पूजा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून केली असेल किंवा व्यक्तिगत कारणांसाठी केली असेल.
बारामतीला सिंगापूरच्या धर्तीवर सुधारले जात आहे. याच बारामतीत जर अशा खुळचट विचाराने रस्त्यावर कर्मकांड होत असतील, तर ‘आपण नेमके चाललोय कुठे,’ असा प्रश्न बारामतीतील सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








