मुंबई,दि.17: भारतीय जनता पार्टीने साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनाच भाजपात प्रवेश दिला आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघर साधू हत्याकांड घडले होते. ज्यावरुन भाजपने महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. पालघर जिल्ह्यात लॉकडाउन काळात दोन निहत्थे साधू (चिनमयानंद आणि सुधाम महाराज) व त्यांच्या चालकाची जमावाकडून निर्घृण हत्या झाली होती.
साधू हत्याकांडात भाजपाने ज्यांच्यावर गंभीर आरोप केलेत, त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ चौधरी यांना मोठ्या दिमाखात भाजपाने प्रवेश दिला आहे. भाजपाने काशिनाथ चौधरींचा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. मात्र या पक्षप्रवेशावरून भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. भाजपने तत्कालीन ठाकरे सरकारवर कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा, हत्याकांडाला प्रोत्साहन देण्याचा गंभीर आरोप ठेवला. पोलिसांच्या उपस्थितीत घडलेल्या हत्येला राजकीय संरक्षण दिल्याचा आरोप केला होता.
भाजपने मुंबई-पालघर जनआक्रोश यात्रा काढली व सीबीआय तपासाची मागणी केली. राष्ट्रवादी नेते काशिनाथ चौधरींवर मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला. याच काशिनाथ चौधरी यांचा भाजप प्रवेश झाल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
साधू हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून भाजपने आरोप लावलेले काशिनाथ चौधरी आता पक्षात सामील झाले आहेत. रविवारी डहाणू येथे खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या समोर त्यांनी कमळ चिन्ह स्वीकारले. त्यांच्यासोबत तीन हजाराहून अधिक समर्थकांनीही भाजपची वाट धरली. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन झाले.








