अपहरण प्रकरण दोन दोषी तर तिघांची निर्दोष मुक्तता

0
अपहरण प्रकरण दोन दोषी तर तिघांची निर्दोष मुक्तता

सोलापूर,दि.16:  अपहरण प्रकरणात न्यायालयाने दोन जणांना दोषी ठरवले तर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकीकत अशी की, फिर्यादी गोकुळ शुगर फॅक्टरीमध्ये ऑपरेटर म्हणून कामास आहे. फिर्यादिच्या पत्नीची बहिण हिचा पती सुमारे 2 वर्षापुर्वी मयत झाल्याने तिचा मुलगा हा 1 वर्षेपासुन फिर्यादीकडे राहणेस होता. त्याचे शिक्षण व पालनपोषाण फिर्यादीच करत असे. लॉकडाउन संपल्यामुळे अडीच महिन्यापासुन शाळा चालु झाल्याने तो दररोज सकाळी 06/30 वा शाळेच्या बसमध्ये जाऊन 2/00 वा शाळा सुटल्यानंतर परत घरी येत असे. 

सदरची शाळेची बस ही शाळेतील मुलाना घेऊन जाण्यासाठी धोत्री गावातील बस स्टॉफजवळील चौकात थांबवुन मुलांना गोळा करून दररोज ने-आण करत असे. तो सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम सोलापूर भवानी पेठ सोलापूर येथील शाळेमध्ये इयत्ता 2 री मध्ये शिकत होता.

दिनांक 30/12/2021 रोजी सकाळी 06/30 वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे फिर्यादीच्या मेव्हुणीचा मुलगा हा शाळेला जाण्यासाठी घरातून शाळेचे दप्तर घेऊन गेला. 

त्यानंतर दुपारी 02:30 वा. स्कुल बसचा ड्रायव्हर यांचा फिर्यादीच्या मोबाईलवर फोन आला की मुलगा हा सकाळी बसमध्ये ही आला नाही व शाळेला ही आला नाही असे कळविल्याने फिर्यादीने शाळेचे शिक्षक यांना फोन केला असता त्यांनी मुलगा हा शाळेत आला नाही असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी स्कुल बसचा ड्रॉयव्हर हा विद्यार्थी घेवुन धोत्री गावात आल्यावर त्याचेकडे व गावातील इतर विद्यार्थी यास विचारले असता त्याने फिर्यादीच्या मेहुणीचा मुलगा हा बसमध्ये ही आला नाही व शाळेत ही आला नाही असे सांगितले. 

फिर्यादीने अजूबाजूच्या गावामध्ये तसेच फिर्यादीच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो कोठेही मिळुन आला. तरी मुलगा हा लहान असल्याचे पाहुन कोणीतरी अज्ञात इसमांने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेलेबाबतची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून फिर्यादीच्या मेहुणीचा मुलगा यास शोधून फिर्यादीच्या ताब्यात सुखरूप दिले व सदर अपहरणामध्ये आरोपी 1) संतोष धुंडप्पा शेडशाळ वय 27 रा. किर्लोस्करवाडी पळुस जि. सांगली 2) नितीन उर्फ चाली धुंडप्पा शेडशाळ वय 23 दोघे रा. किर्लोस्करवाडी पळुस जि. सांगली 3) लक्ष्मण किसन चव्हाण वय 28 रा लव्हे कुटुंबाडी ता. माढा जि. सोलापुर 4) केदार बाळासाहेब शिवपुजे वय 19 रा. कुंडल हायस्कुल शेजारी पळुस जि सांगली 5) रमेश भिमगोंडा बिरादार वय. 38 रा. हल्लुर ता. मुडलगी जि. बेळगाव राज्य, कर्नाटक यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. 

विशेषतः आरोपी संतोष शेडशाळ, नितीन शेडशाळ, व रमेश बिरादार हे फिर्यादीची मेहुणी हिचे नातेवाईक असल्याचे उघडकीस आले. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी, अपहृत बालक, मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर व सदर केसचे तपासाधिकारी हे होते. 

सदर खटल्यामध्ये आलेल्या पुराव्यांची मीमांसा करत सत्र न्यायालयाने आरोपी नामे १) संतोष शेडशाळ व २) नितीन शेडशाळ यांना दोषी ठरवत प्रत्येकी ३ वर्ष सक्तमजुरी व २०,०००/- चा दंड ठोठावला. तर इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात इतर ३ आरोपींतर्फे तपास अधिकारी व मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर व ओळख परेड घेतलेले अधिकारी यांची उलट तपासणी निर्णायक ठरली.

सदर निर्दोष आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करतेवेळेस अनेक महत्वाचे मुद्दे मांडले ते अशाप्रकारे कि आरोपी हे प्रत्यक्ष अपहरण कर्त्यांच्या संपर्कात असल्याबद्दलची बाब ठळकपणे सिद्ध झालेली नाही. तसेच ज्याचे अपहरण झालेले आहे तो बालक इतर निर्दोष आरोपींच्या ताब्यात मिळाला नाही व निर्दोष आरोपींचे मोबाईल लोकेशन घटनेवेळी वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यामुळे हे आरोपी अपहरणाच्या कटामध्ये सामील होते असे म्हणता येणार नाही. असा युक्तिवाद करण्यात आला. 

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील संशयित आरोपी 3) लक्ष्मण किसन चव्हाण वय 28 रा लव्हे कुटुंबाडी ता. माढा जि. सोलापुर 4) केदार बाळासाहेब शिवपुजे वय 19 रा. कुंडल हायस्कुल शेजारी पळुस जि सांगली 5) रमेश भिमगोंडा बिरादार वय. 38 रा. हल्लुर ता. मुडलगी जि. बेळगाव राज्य, कर्नाटक यांची जिल्हा न्यायाधीश श्री. आर. जे. कटारिया यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात सरकारतर्फे अॅड. ए. जी. कुलकर्णी यांनी तर निर्दोष आरोपींतर्फे अॅड. अभिजित इटकर, अॅड. विक्रांत फताटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here