मुंबई,दि.१५: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. भाजपा आणि मित्रपक्षाला २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. बिहार निवडणुकीत महाआघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला असून विरोधकांना ५० जागांचा आकडाही गाठता आलेला नाही. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या निकालावर गंभीर भाष्य केले आहे.
केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये वाटले. या पैशांमुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला, असा दावा शरद पवार यांनी शनिवारी केला. सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहारमध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती, असेही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार म्हणाले “ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये टाकले. या निवडणुकीत काही वेगळा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. पण मला अधिकृत माहिती नाही. या निकालाबाबत दोन तीन गोष्टी आहेत. या निवडणुकीत जे मतदान झालं त्याच्याविषयी मी काही लोकांशी बोललो. त्यांनी सांगितलं की या निवडणुकीत मतदान महिलांनी हातात घेतलं होतं. मला एक शंका होती की बिहारच्या महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याचा अर्थ आहे की दहा हजार रुपये देण्याची जी योजना आहे त्याचा हा परिणाम असावा. त्याचवेळी मतदान झालं होतं. महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाटले. मताला पैसे येतात तसे नाही. अधिकृतपणे पैसे वाटले गेले. तसंच यावेळी बिहारमध्ये झालेले आहे.”








