सोलापूर,दि.७: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली असून आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
या प्रकरणी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मनोज जरांगे यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी लॉरेन्श बिश्नोई गँगकडून त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा करण्यात येत होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. धनंजय मुंडे यांनी आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
काल हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती आणि यात एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप केला. यानंतर सर्व घटनाक्रम सांगत त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले. यामुळे खळबळ उडाली असून मराठा समाजाने शांत राहावे असे आवाहन जरांगे यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितला धक्कादायक घटनाक्रम
जरांगे पाटील यांनी सांगितलेला घटनाक्रम धक्कादायक आहे. जरांगे पाटील याबाबत म्हणाले, हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरली होती, त्यापैकी ५० लाख रुपये देण्यात आले होते. बीडमधील कांचन नावाचा व्यक्ती धनंजय मुंडे यांचा पीए (कार्यकर्ता) आहे. त्याने दोन आरोपींपैकी एका आरोपीला त्याने परळीला नेले होते. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी झाल्टा फाटा येथे धनंजय मुंडे यांनी या आरोपींची भेट घेतली. ‘आम्ही त्याला ठोकतो’ असे आरोपींनी सांगितल्यावर, मुंडे यांनी ‘मी जुनी गाडी देतो’ असे आश्वासन दिले. “या घातपाताच्या कटाचे मूळ धनंजय मुंडे आहे.” असा दावा जरांगे यांनी केला. तसेच खून करून राजकारणामध्ये माणूस मोठा होत नाही. हा प्रकार गंभीर आहे, सर्वांनी हुशार होणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.








