सोलापूर,दि.२३: पाकिस्तानने अलिकडेच अफगाणिस्तानात हवाई हल्ले करून तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा प्रमुख नूर वली मेहसूदला ठार मारले. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने नूरला ठार मारल्याचा दावा केला होता, जो दावा नंतर टीटीपी प्रमुख मेहसूदने स्वतः एका व्हिडिओमध्ये खोटा ठरवला. पाकिस्तानने टीटीपीवर नियंत्रण मिळवण्याबाबत अनेक दावे केले परंतु ही संघटना अद्यापही त्यांची ताकद दाखवून देत आहे.
टीटीपीने अजूनही आपली ताकद कायम ठेवली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये टीटीपीचे सदस्य केवळ मुक्तपणे फिरत नाहीत तर रस्त्यांवर चौक्याही उभारल्या आहेत. यामुळे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासमोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे.
पेशावरजवळ टीटीपीचे बंडखोर रस्त्यांवर चौक्या उभारताना दिसत असलेले कथित व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून असे दिसून येते की पाकिस्तानी सरकार आणि लष्कराचे या भागावर पूर्ण नियंत्रण नाही. पेशावरच्या आसपासच्या भागात पाकिस्तानी सैन्य किंवा पोलिस दिसत नाहीत. येथे टीटीपीच्या गटाचे नियंत्रणात आहे.
टीटीपीने पेशावरचा ताबा घेतल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अलिकडच्या करारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहमद शरीफजाद यांनी एक्स वर लिहिले की, “टीटीपीने पेशावरला जाणारा मुख्य रस्ता रोखला. याचा अर्थ तालिबानने त्यांचे वचन मोडले आहे.”








