सोलापूर,दि.22: सोलापूर भाजपाच्या (Solapur BJP) कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. इतर पक्षाच्या नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात येऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. घोटाळ्यात अडकलेल्या आणि जनतेची फसवणूक केलेल्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यासाठी भाजपाच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्वीकारले. कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाकडे पोहोचवू असा शब्द दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार बबन शिंदे, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने हे भाजपात प्रवेश निश्चित करणार असल्याची चर्चा आहे. सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.
2014 पासून दक्षिण तालुक्यात भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहेत. त्यापूर्वी येथील नेत्यांनी भाजपचा एकही पंचायत समिती सदस्य होऊ दिला नाही, आता त्यांना पक्षात का घेता असा सवाल अनेकांनी केला. असा सवाल अनेकांनी केला. इतर पक्षांतील आलेल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असल्याची भावना यावेळी हनुमंत कुलकर्णी, विशाल गायकवाड, अंबिका पाटील सर्जेराव पाटील, डॉ. शिवराज सरतापे आदींनी व्यक्त केली.
या आंदोलनात संगप्पा केरके, यतीन शहा, अश्विनी चव्हाण, मनिषा हुच्चे, राम जाधव, सोमनाथ केंगनाळकर, शारदा श्रीमंगले, जिलानी सगरी यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपमधून मोठा विरोध झाला. भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. असं असतानाही हा सगळा विरोध डावलून सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.








