मुंबई,दि.१५: Raj Thackeray On Voter List: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत काल (दि.१४) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेत निवेदन दिले होते. आज परत एकदा त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेतली. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली. निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांमध्ये मोठे घोळ आहेत. या सगळ्याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली आहे. असे मनसे अध्यक्ष ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे ह्यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील निवडणूक याद्या आणि प्रक्रीयेत असलेल्या घोळाबाबत आक्षेप मांडले. ह्या शिष्टमंडळात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी निवडणूक आयोग लपाछपी का करत आहे? अशी विचारणा केली. आम्ही निवडणूक आयोगाला मतदारयाद्या दाखवल्या आहेत, त्यात घोळ आहे. ते घोळ त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून याद्या सुधारायला हव्यात. त्यानंतरच ही निवडणुकीला सामोरं जायला हवं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांचाही उल्लेख केला.
याद्यांमधील घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका
राज्य निवडणूक आयोग हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवत आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग संबंधित काम राज्य निवडणूक आयोगाकडे असल्याचे सांगत आहे. गेल्या ५ वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, अजून ६ महिने निवडणुका लांबल्या तरी अडचण काय, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
राज ठाकरे म्हणाले की, मतदार हा गोपनीय कसा असेल, तुम्ही याद्या जाहीर करता. मतदान गोपनीय असते. निवडणूक आयोगाचा घोळ काही कळत नाही. २०२२ च्या याद्या नाव आणि फोटोंसह आहेत आणि आताच्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकले आहेत. हे सगळे निवडणूक आयोग करत आहे आणि ते हे का करत आहेत, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.
कोणी कोणाला काढले तेच… | Raj Thackeray On Voter List
राज ठाकरे म्हणाले २०२४ मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यातील तपशील सांगतो. त्यामुळे यादीत काय प्रकारचा घोळ आहे, ते समजेल. मतदारसंघ १६० कांदिवली पूर्व नाव धनश्री कदम, वय -२३, वडिलांचे नाव दीपक कदम, वय – ११७, मतदारसंघ १६१ चारकोप, नंदिनी चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय – १२४, महेंद्र चव्हाण यांच्या वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय ४३ कोणी कोणाला काढले तेच कळत नाही, असे राज ठाकरे यांनी सांगताच एकच हशा पिकला. तसेच २०२४ नंतर निवडणूक आयोगाने जी मतदारयादी जाहीर केली, त्यात फक्त नावे येत आहेत. यापूर्वी ज्या मतदारयाद्या येत होत्या, त्यात नावे, पत्ता आणि फोटो सगळेच येत होते, याकडेही राज ठाकरेंनी लक्ष वेधले.
संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता
“2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीला 232 जागा निवडून आल्या. 232 जागा आल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रात व्हायला हवा होता, त्याप्रकारचा जल्लोष नव्हता. हे कसं द्योतक आहे. निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा ही कसली निवडणूक आहे,” असा टोला त्यांनी लगावला.








