सोलापूर,दि.१०: MLA Shivaji Patil Honey Trap: आमदाराला अश्लील फोटो पाठवून धमकी देत महिलेने १० लाख रुपये मागितले. आमदार शिवाजी पाटील यांना ब्लॅकमेल करण्याचा अनेकदा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आमदार पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. १० लाख रुपये मागणाऱ्या महिलेची वर्षभरापूर्वीच ओळख झाली होती, अशी माहिती समोर येत आहे.
ही महिला आमदार शिवाजी पाटील यांच्याशी चॅटिंग करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्या महिलेनं या काळात सतत चॅटिंग करून ओळख वाढवली, तसेच कधी एक लाख, कधी दोन लाख रुपयांची मागणी करून रक्कम घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
ही महिला गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करत होती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना एक लाख, कधी दोन लाख रुपयांची मागणी करत होती. मात्र त्या महिलेचा नंबर आमदार पाटील यांनी ब्लॅाक केल्यानंतर या महिलेने पाटील यांना अश्लील फोटो पाठवले आणि १० लाख रुपयांची मागणी केली.

त्या महिलेने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीन आणि राजकीय प्रतिमा मलिन करीन, अशी धमकीही तिने दिली.
सततच्या त्रासाला कंटाळून पैशांची मागणी वाढल्यानंतर पाटील यांनी ८ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात सायबर हनी ट्रॅपचा हा प्रकार असून, आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.








