सोलापूर,दि.२९: Solapur Flood: सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भीमा विकास उपविभाग क्र.१० कुर्डुवाडी येथील उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार कव्हे (ता. माढा) येथील को.प. बंधाऱ्यापासून शिरापूर (ता. मोहोळ) येथील बंधाऱ्यापर्यंत एकूण १२ को.प.बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.रात्रीच्या वेळी पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी ठेवावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (Solapur Flood News)

उपविभागीय अभियंत्यांनी माढा व मोहोळ येथील तहसीलदार यांना याबाबत पत्राद्वारे कळविले असून सर्व तलाठी, ग्रामसेवक व संबंधित कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना वेळेवर सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठाजवळ जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वरच्या धरणातून सीना नदीच्या पात्रात पुन्हा एकदा मोठा विसर्ग सुरु करण्यात आल्याने या नदीकाठची पूरस्थिती कायम आहे. भय इथले संपत नाही अशी अवस्था सध्या पूरग्रस्तांची झाली आहे. वरच्या धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यास सुरुवात झाल्यानंतर सीना भोगावती नदीला आलेला महापूर ओसरण्यास सुरुवात झाली होती.
तात्पुरत्या निवारा कक्षातील शेतकरी आणि ग्रामस्थांना आता आपल्या घराकडे जाण्याचे वेध लागले होते. सर्वत्र चिखलमय परिस्थिती असल्याने घरी जाऊन करायचे काय ? खायचे काय ? यासह विविध प्रश्नांनी पूरग्रस्तांना ग्रासले होते. त्यातच पुन्हा आता वरच्या धरणातून सीना नदीत पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठी पुन्हा एकदा जैसे थे स्थिती उद्भवली आहे.
Solapur Flood | मोहोळ तालुक्यातील या गावांना फटका
मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठच्या मुंडेवाडी, अष्टे, अर्जुनसोंड, लांबोटी ,पोफळी, विरवडे खुर्द ,शिरापूर (सो) बोपले, एकुरके, पासलेवाडी, शिंगोली, पीरटाकळी, रामहिंगनी, नांदगाव, वीरवडे बुद्रुक, शिरापूर( मो), तरटगाव, नरखेड, भोयरे, मलिकपेठ, घाटणे आणि मोहोळ या गावांना फटका बसला आहे.








