Maharashtra Rain: पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार

Maharashtra Rain Update: हवामान विभागाचा अंदाज

0

सोलापूर,दि.२७: Maharashtra Rain Update: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून, आजपासून (ता. २६) पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Rain Alert News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस कोकण, घाटमाथा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात काल (दि.२६) रात्री तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. सोलापूर शहरातील अनेक भागात रात्रीपासून पाऊस सुरू होता. कोकणातील सर्व जिल्‌ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्हे वगळता नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शनिवारी कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची अंदाज असून विर्दभात सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

रविवारी संपूर्ण कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्याचा घाटमाथ्यावर आणि छत्रपती संभाजिनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि जालना, परभणी, बीड, धाराशिव जिल्ह्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

सोमवारी संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे. या पावसामुळे काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने देखील नागरिकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here