कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले हे निर्देश

0

मुंबई,दि.28: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे (omicron) अनेक देशात खळबळ माजली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच अन्य महत्त्वाचे अधिकारी आणि मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तिथूनच त्यांनी ही बैठक घेतली. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका पाहता उद्या राज्य मंत्रिमंडळाचीही बैठक घेऊन मुख्यमंत्री पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाचा नवा अवतार म्हणजेच ओमिक्रॉन व्हायरसची पूर्ण जगाने धास्ती घेतलीय. कोरोनाला थोपवण्यासाठी देशपातळीवर आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच अन्य अधिकारी आणि मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व करा, असे स्पष्ट निर्देश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेतला व त्यानंतर प्रशासनाला निर्देश दिले. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याची गरज असून त्यात कोणतीही ढिलाई चालणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले. लॉकडाऊनबाबतही मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले व नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here