नाशिक,दि.२४: राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मांसाहार आणि पांडुरंगाचा उल्लेख करत विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुळेंनी शनिवारी नाशिकमधील एका जाहीर कार्यक्रमात मांसाहारासंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नाशिकमधील दिंडोरी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याच अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना सुळे यांनी मांसाहाराचा उल्लेख केला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
जाहीर कार्यक्रमात मांसाहारासंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ असा सवाल करणाऱ्या सुप्रिया सुळेंना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडींनेही थेट शरद पवारांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर फडणवीसांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये, “याचे उत्तर मी देणार नाही, याचे उत्तर महाराष्ट्रातील तमाम वारकरी देतील,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.