सोलापूर,दि.२: दौंडमधील यवत येथे दोन गटामध्ये तणाव निर्माण झाल्याने वाद झाला होता. अलिकडच्या काळात दोन समुदायात वाद, भांडण आणि हाणामारी वाढत चालली आहे. यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी पक्षातर्फेच महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जातात.
वातावरण तापवून, समजामध्ये विष पसरवून निवडणुकांना सामोरे जायचे, हे भाजपचे राष्ट्रीय धोरण असल्याची घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.
लहान लहान घटनांमुळे राज्यात दोन समाजात वाद निर्माण होत आहेत. राऊत पुढे म्हणाले की, लहान लहान घटनांवरून दंग्यांचे भडके उडताहेत. प्रार्थना स्थळांवर हल्ले होताहेत. महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता. पण वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक द्वेष निर्माण करायचा आणि अशा पद्धतीने समाजामध्ये विष पसरवून निवडणुकांना सामोरे जायचे हे फक्त महाराष्ट्रच नव्हते तर देशभरात भाजपचे राष्ट्रीय धोरण आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडताहेत. याचा परिणाम महाराष्ट्रातील उद्योगधंदे, रोजगार आणि विकासावर होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री सांगताहेत की गुंतवणूक वाढली. पण दौड हा औद्योगिक पट्टा आहे. तिकडे एमआयडीसी, कारखाने, उद्योग आहेत. बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर त्याला जबाबदार कोण आहे? पोलीस काय करताहेत? मंत्री काय करताहेत? कुणाचे राज्य आहे महाराष्ट्रात? असा सवाल करत ही गंभीर बाब असल्याचेही राऊत म्हणाले.