मुंबई,दि.२७: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सोशल मीडियावर देखील उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छांचे ट्विट केले आहे.
”माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या”, असे राज ठाकरे यांनी पोस्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही भावांची जवळीक वाढली असून यामुळे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आनंद होत आहे.