दि.27: कोविड-19चा नवीन प्रकार B.1.1529 दक्षिण आफ्रिकेत समोर आला आहे. नवीन प्रकार समोर आल्यानंतर, शास्त्रज्ञांनी जागतिक स्तरावर कोविड संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी एक चेतावनी जारी केली आहे की नवीन प्रकारावर, कोविड लस निष्प्रभ ठरू शकते, संसर्गाचा दर खूप वेगवान असू शकतो आणि रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसू शकतात.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याने केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.
नियमावली
रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही.
महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या 72 तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक
सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल.
मास्क घातलेला नसेल तर 500 रुपये दंड
दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला 10 हजार दंड, तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला 50 हजार दंड
राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार दंड
भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ 25 टक्के लोकांनाच उपस्थिती
टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास 500 रुपये दंड तसेच वाहन मालकासही 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल.
किमान 6 फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई