बनावट कागदपत्रे तयार करून प्लॅाट विक्री प्रकरण एकास जामीन मंजूर 

0

सोलापूर,दि.१५: बनावट कागदपत्रे तयार करून प्लॅाट विक्री प्रकरणात न्यायालयाने एकास जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी सुनील नान्नजकर रा. सोलापूर या आरोपीस बनावट कागदपत्रे तयार करून २ प्लॉट हडपल्याप्रकरणी सोलापुर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांनी जामीन मंजूर केला.

यात हकिकत अशी की, फिर्यादी यांची आई या सोलापूर येथे नोकरीस होत्या व त्या २००१ साली सेवानिवृत्त झाल्या. तसेच फिर्यादी यांचे वडील हे सन २००५ मध्ये केरळ मध्ये मयत झाले आहेत. सन १९८६ साली फिर्यादी यांच्या आईची मुंबईहून सोलापूरला बदली झाल्यामुळे फिर्यादी हे सोलापूर येथे राहण्यास आले. त्यावेळी फिर्यादी यांचे वडील यांनी सन १९९० साली मजरेवाडी, सोलापूर येथे २ गुंठे जागा घेतली होती. 

सन १९९८ मध्ये फिर्यादी यांचे ओळखीचे राजू शहा यांची पत्नी व फिर्यादी यांची आई या एकत्र काम करत होत्या त्यामुळे फिर्यादी हे राजू शहा यांच्या फर्निचरच्या दुकानात जावून बसत होते. त्यावेळी त्यांच्या दुकानात आरोप सुनील नान्नजकर हे सुद्धा तेथे येत होते त्यामुळे फिर्यादी व त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी हे सन २००१ मध्ये त्यांची आई सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या मुळगावी केरळ येथे राहण्यास गेले. फिर्यादी हे केरळ येथे असताना फिर्यादी व आरोपी यांचे एकमेकांसोबत फोन वर बोलणे होत होते. 

त्यानंतर सन २००५ साली फिर्यादीचे वडील मयत झाल्याने आरोपी हे फिर्यादी यांना केरळ येथे भेटण्यास गेले होते. फिर्यादी यांचे वडील मयत झाल्याने फिर्यादी यांची परिस्थिती बिघडल्यामुळे फिर्यादी यांनी सोलापूर येथील त्यांच्या वडिलांनी घेतलेले २  प्लॉट विकायचे आहेत असे सांगितले होते. त्यावेळी आरोपीने मी बघून सांगतो, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने तुमचे प्लॉट गुंठेवारी असल्यामुळे ते एन.ए. करावे लागतील त्यासाठी खर्च ३४,००० /- येईल असे सांगितले. 

त्यानुसार फिर्यादी यांनी कागदपत्रे व पैसे आरोपीस पाठविले. त्यानंतर वारंवार विचारणा करून हि अद्याप प्लॉट विकला गेला नाही असे आरोपी सांगत होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये फिर्यादी यांच्या ओळखीचे साबू यांनी फिर्यादी यांच्या आईस तुमचे दोन्ही प्लॉट हे आरोपी सुनील नान्नजकर यांनी बसवराज बिराजदार यांना विकलेले आहेत. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या आई यांनी सोलापूर येथे येऊन साबू यांना भेटून सदर प्रकरणाची खरेदी विक्री करणारा इसम कुंभार यांना वरील दोन्ही प्लॉटचे सात बारा उतारा काढून देण्यास सांगितले व त्या उताऱ्यावर बसवराज बिराजदार यांचे नाव लागले होते. 

तेव्हा कुंभार यांनी बसवराज बिराजदार यांना तुम्ही विकत घेतलेल्या प्लॉटचे मूळ मालक तुम्हास भेटण्यास आले आहेत असे सांगितले. पण बसवराज बिराजदार हे काही भेटण्यास आले नाहीत व त्यांनी सदर उताऱ्यावर एका पतसंस्थेचे कर्ज काढले होते. फिर्यादी यांनी प्लॉटचे खरेदी दस्त काढून घेऊन पहिले असता त्यावर दस्त देणार म्हणून फिर्यादी यांचे वडील यांचा फोटो, सही व अंगठा होता व लिहून घेणार म्हनून बसवराज बिराजदार यांचे नाव होते व साक्षीदार म्हणून आरोपी सुनील नान्नजकर यांनी फोटो सह सही व अंगठा केलेला होता. 

अशा रीतीने फिर्यादीचे वडील मयत असताना आरोपी सुनील नान्नजकर याने फिर्यादीचे वडिलांच्या जागी तोतया इसम उभा करून बनावट आधार कार्ड बनवून फिर्यादी यांचे दोन्ही प्लॉट बनावट खरेदी दस्त तयार करून रक्कम रुपये ३०,००,००० /- यास विकले आहेत. अशा आशयाची फिर्याद सदर बझार पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.

सदर कामी आरोपी नामे सुनील नान्नजकर यांनी अॅड. अभिजीत इटकर यांच्या मार्फत जामीन मिळणे कामी सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालय येथे अर्ज दाखल केलेला होता. यात आरोपी तर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सदर आरोपीने सदर खरेदी दस्तमध्ये फक्त साक्षीदार म्हणून सही केलेली आहे. तसेच सदर दस्ताबाबतची आरोपीस काही एक माहिती नाही तसेच मुख्य आरोपी व सुनील नान्नजकर यांच्यामध्ये संगनमत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचा  जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा. 

सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांनी आरोपी आरोपी नामे सुनील नान्नजकर  रा. सोलापूर यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे , अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख, अॅड.  सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here