मुंबई,दि.२७: उध्दव आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. हिंदी सक्तीविरोधात याआधी मनसेने 5 जुलै तर उद्वव ठाकरेंच्या शिवसेनेने 7 जुलैला मोर्चा जाहीर केला होता. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्रित मोर्चा काढणार आहेत. संजय राऊत यांनी एक्सवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत हे जाहीर केलं आहे.
महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून भाषिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकार विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. मराठीचा झेंडा हाच अजेंडा… हिंदी सक्तीविरुद्ध सगळे एकत्र! अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केली. 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. याच संदर्भात आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करत मोठी माहिती दिली.
संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. ‘महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’, असे राऊत यांनी म्हटले. यासोबत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक फोटोही शेअर केला आहे. याचा अर्थ हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचा एकत्र मोर्चा निघेल.