मुंबई,दि.25: आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरतं मागे घेत असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) केली. “पहिल्या टप्प्यातील एसटी कामगारांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. आम्ही कामगारांसोबत आहोत. सरकारने केलेली वेतनवाढ हा आंदोलनाचा विजय आहे.” असे सदाभाऊ खोत म्हणाले.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आले असल्याचे सांगत एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
विलिनीकरणाचा निर्णय येईपर्यंत वेतवाढीचा निर्णय सरकारने घेतला. हा आंदोलनाचा पहिला विजय आहे. दुसऱ्या बाजूला सरकारने सरकार एसटीकडे निधी वर्ग करून नियमित वेतन होणार आहे. विलिनीकरणाचा लढा सुरू असला तरी पहिला टप्पा जिंकलेला आहे. भविष्यात विलिनीकरणाची लढाई सुरूच राहिल. कामगार जेव्हा जेव्हा बोलवतील तेव्हा तेव्हा आम्ही जावू, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन कामगारांनी सुरू केलेले आहे.त्यांनी ठरवावे ते कधीपर्यंत चालवावे. मात्र, आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे, अशी घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे.