बीड,दि.१: Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीकडून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात १५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. खंडणी घेण्यात अडथळा ठरत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून केजच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
वाल्मिक कराड याला पोलिसांनी तपासाअंती देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचा आरोपी म्हटलंय. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली असून, संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा मेसेज वाल्मीक कराडने विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, हे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार या प्रकरणात एकूण पाच गोपनीय साक्षीदार आहेत. खंडणी घेण्यात अडथळा ठरत असल्याने वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून हे हत्याकांड घडल्याच्या दाव्यांना पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून पुष्टी मिळाली आहे.