छावा चित्रपटामुळे पोलिसांना सापडले दोन सराईत गुन्हेगार 

0

पुणे,दि.२३: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावामुळे पोलिसांना दोन सराईत गुन्हेगार सापडले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात छावा चित्रपटाची क्रेझ आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. छावा चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहिला आहे तर अनेकांना हा चित्रपट पाहायचा आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये छावा चित्रपटाचे मॅार्निंग शोसुध्दा हाऊसफुल होत आहेत. मोठ्या संख्येनं चाहते थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट पाहत आहेत. जगभरात हा चित्रपट मोठी कमाई करत आहे. 

हा चित्रपट पाहण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये फार उत्सुकता दिसून येत आहे. मात्र ‘छावा’ चित्रपट पाहण्याचा हाच उत्साह दोन आरोपींना महागात पडला आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. हा अगदी फिल्मी वाटावा असा प्रकार पुण्यात घडला आहे. 

‘छावा’ चित्रपट बघण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हडपसर भागात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड असं अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. हे दोघेही दिघी येथील आदर्श नगरमधील शिव कॉलनीमध्ये राहतात. दोन्ही आरोपींवर यापूर्वी मकोका, तसेच एनडीपीएस कायद्याबरोबर शस्त्र कायद्याअन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोघांना थेट चित्रपटगृहामधून अटक करण्यात आली आहे. दोघेही चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आणि हे आरोपी आयतेच पोलिसांच्या जाळ्यात सापडले.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here