मुंबई,दि.4: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत मराठी अभिनेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे. अखंड महाराष्ट्रासह देशभरात आपल्या कर्तृत्त्वं आणि सामर्थ्याची गाथा पोहोवणारे छत्रपती शिवाजी महाराज अनेकांच्याच प्रेरणास्थानी आहेत.
काय म्हणाले राहुल सोलापूरकर?
छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवली याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, असं अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी म्हंटलंय. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटल्याचं सांगताना त्यांनी किती हुंडी वटवला याचेही पुरावे असल्याचं त्यांनी यु ट्यूब चॅनलच्या मुलाखतीदरम्यान सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीरासह त्याच्या बायकोला लाच दिली, मोहसीन का मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही- शिक्का असणारं अधिकृत पत्रही त्यांनी घेतल्याचं सोलापूरकरांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.