जालना,दि.3: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचा उल्लेख करत गौप्यस्फोट केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड आरोपी आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचे जवळचे संबंध असल्याचा आरोप वारंवार होत आहे. कराड हा मुंडे यांचाच सहकारी असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडबाबत गौप्यस्फोट केला आहे.
आज (3 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवर भाष्य केलं. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड भेटायला आले होते, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. 8 दिवसांपासून फोन येत होते. रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता. आणि मला सांभाळा असे म्हटलं. मी झोपलो होतो ते आत आले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला. दरम्यान, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. याच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण-यातना भोगल्या या टोळीमुळे, असा दावाही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.