मुंबई,दि.2: शिवसेना नेते तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्र गटांना मोठे बहुमत मिळूनही राज्य पुढे जाताना दिसत नाही, याचे कारण मुख्यमंत्री फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातला विसंवाद. पुन्हा मुख्यमंत्री केले नाही या धक्क्यात शिंदे अजून झुलत आहेत व पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी धडपडत आहेत, हे फडणवीस ओळखून आहेत. असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिंदे गटातील 20 ते 25 आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली आहेत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच 20-25 लोक आहेत हे फडणवीस किंवा अमित शाहांच्या सांगण्यावरून सूरतला गेले होते असेही संजय राऊत म्हणाले.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, सामनाच्या रोखठोकमध्ये एक विषय मांडला आहे. आणि हा विषय सगळ्यांनाच माहित आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार जरी बहुमतातलं असलं तरी ते एकसंघता नाही एकवाक्यता नाही. आणि एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करायचे सुरू आहे. पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद, ज्याला आपण बार्गेनिंग पॉवर म्हणतो ती भाजपने संपूर्ण संपली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सरपटणारा प्राणी झाला आहे असे संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे हे खासगीत सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपदी मीच राहणार असे वचन मिळाल्यामुळे आम्ही फुटलो. मला विधानसभा 2024 नंतरही आपणच मुख्यमंत्री राहणार हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही हे त्यांना विचारा, मी खोटं बोलत नाही. काल निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं.