पुणे,दि.28: गुलेन बॅरी सिंड्रोमचा (जीबीएस) धोका वाढला आहे. जीबीएस दूषित पाण्यामुळे होतो. ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ने (जीबीएस) पुण्यात थैमान घातले असून, रुग्णसंख्या शंभरीपार झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 101वर पोहोचली आहे. यातील 41 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत, तर 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत केवळ पुण्यात या आजाराचे रुग्ण आढळत होते. परंतु, आता कोल्हापूरमध्येही दोघांना जीबीएसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) पथक पुण्यात दाखल झाले आहे. आतापर्यंत नोंद झालेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 80 रुग्ण पुणे महापालिकाहद्दीतील, तर 15 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीतील आहेत. सहा रुग्ण इतर जिह्यांतील आहेत.
पुण्यात ‘गुलेन बॅरे सिंड्रोम’चा प्रसार वेगाने होत असल्याने आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकाकडूनही जास्त रुग्णसंख्या आढळून आलेल्या परिसराची पाहणी केली जात आहे.
एकाचा मृत्यू
पुण्यातील धायरी भागात राहणाऱ्या एका 40 वर्षीय रुग्णाचा ‘जीबीएस’ आजाराने मृत्यू झाला आहे. तो व्यवसायाने सीए होता. हा रुग्ण 11 जानेवारी रोजी सोलापूरला गावी गेला होता. मात्र, जास्त त्रास जाणवत असल्याने 18 जानेवारी रोजी या रुग्णाला तेथील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना 25 जानेवारी रोजी संध्याकाळी या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जीबीएस या आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. कोगनोळी कर्नाटक येथील 60 वर्षांचे वृद्ध आणि हुपरी (ता. हातकणंगले) येथील 6 वर्षांच्या मुलावर दोन दिवसांपासून सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे.