मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहचवण्याचा संकल्प

0

मुंबई,दि.7: मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहचवण्याचा संकल्प असल्याचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीवेळी आज विधानभवनात नाट्यमय घडामोडी घडल्या. हे सरकार जनादेशाने आले नसून ईव्हीएम घोटाळ्याच्या जीवावर निवडून आलं आहे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या आमदारांनी अचानक सभात्याग केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी गावातील नागरिकांनी बॅलेट पेपवर मतदान घेण्याची तयारी केली होती.

जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मारकवाडी येथील ग्रामस्थांनी शंका व्यक्त करत बॅलेट पेपरने मतदान घेण्याचे ठरवले होते. यासाठी ‘मॉक पोल’चे आयोजन करण्यात आले होते. मात्र घाबरलेल्या सरकारने हा ‘मॉक पोल’ थांबवला आणि ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल केले. काही जणांना अटकही केली. 

आव्हाड यांनी स्वातंत्र्यांचा दुसरा अध्याय सुरू झाला असून मारकडवाडीचा प्रयोग आधुनिक भारताचा ‘दांडी मार्च’ असेल असे विधान यावेळी केले. ते म्हणाले की, मारकडवाडी येथे जो प्रयोग होणार होता तो सरकारने जबरदस्तीने थांबवला. लोकांना आंदोलनाचा अधिकार आहे. तो अधिकार सरकारने हिरावून घेतला आणि अटकसत्र सुरू केले. महात्मा गांधी यांच्या विचारांना पुढे घेऊन मारकडवाडीतील ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचे ठरवले. त्यांना नक्की गुन्हा काय? त्यांना अटक का केली? मारकडवाडीचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल म्हणून सरकार घाबरले आणि अटक करून फुंकर मारली.

सामान्य माणसाला घाबरवून, दरडावून राज्य करता येते असा समज असेल तर सामान्य माणूस राज्य पलटवू शकतो हे दांडी मार्चने दाखवून दिले होते. स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्चची यात्रा नवीन चालना देणारी ठरली, तसेच एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी मारकडवाडीचा प्रयोग आधुनिक भारताचा दांडीमार्च असेल. नवीन दांडी मार्च मारकडवाडीच्या नावाने ओळखला जाईल, असे आव्हाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here