मुंबई,दि.20: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने (BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी दिला आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस लढणार आहेत. तसंच कामठी येथून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर शहर उत्तरमधून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख तर दक्षिण सोलापूरमधून आमदार सुभाष देशमुख यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजप यंदा अनेक उमेदवारांची तिकीटे कापणार, अशी चर्चा होती. पण, ही यादी पाहता पक्षाने बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, अद्याप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत भाजपने आपले 99 उमेदवार जाहीर केले आहेत. आता अजून किती उमेदवार जाहीर होणार, हे लवकर समोर येईल.
भाजपाच्या पहिल्या यादीत 99 पैकी 13 महिला उमेदवार आहेत. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून 99 पैकी 6 एसटी आणि 4 एससी उमेदवार आहेत. बेलापूरमधून पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना तिकीट मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या जागेवर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे.