निवडणुकीच्या तारखांवरून संजय राऊत यांनी केला हा आरोप

0

नवी दिल्ली,दि.15: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार आहे. तारीख जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागेल. केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा होणार असून तारखांसदर्भात आम्ही प्रतिक्षेत आहोत. एकाच टप्प्यात ही निवडणूक व्हायला हवी, मात्र सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याने चर्चेतून तारखा ठरल्या असून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराकडे पैशाचा पहिला हप्ताही पोहोचला आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केले.

दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रा सारख्या महत्त्वाच्या राज्याच्या निवडणुका निष्पक्षपणे घ्याव्यात. कोणत्याही दबावाखाली निवडणुका घेऊ नयेत. सत्ताधाऱ्यांचे जे विरोधक आहेत त्यांना अकारण छळू नये, त्रास देऊ नये. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात खास करून पैशाचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग निवडणुकीत केला जातो तो रोखण्यासाठी आयोगाने जागरूक रहावे ही माफक अपेक्षा आहे.

निवडणूक आयोग तारखा जाहीर करेल आणि आचारसंहिता लागेल म्हणून राज्यातील काही सत्ताधारी पक्षाने आपापल्या उमेदवारांपर्यंत पैशाचे वाटप काल रात्रीपर्यंत करून घेतले. प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराकडे 10-15 कोटी रुपये पोहोचल्याची पक्की खबर आपल्याकडे असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

निवडणुकीची घोषणा होईल, आचारसंहिता लागेल याची पक्की खबर सत्ताधाऱ्यांना असते. त्यामुळे सरासरी 10-15 कोटी रुपयांचा पहिला हप्ता रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतेक सर्व मतदारसंघात पोहोचला आहे, ही माहिती मी निवडणूक आयोगालाही देत असून त्याचे काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. किंबहुणा हे सगळे वाटप झाल्याची माहिती आल्यावरच निवडणुकीची घोषणा होतेय का? अशी शंकाही राऊत यांनी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here